श्री गुरुदेवांना वयाच्या पाचव्या वर्षी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी स्वप्नदर्शन दिले आणि काही काळानंतर श्री विठ्ठलाची मूर्ती स्वप्नात दिसली. गुरुदेव म्हणतात, ‘पाच वर्षाचे असताना मला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी स्वप्नदर्शन दिले तेव्हापासून माझे मन बेचैन झाले ते यासाठी, की हे कोण होते, का आले असावेत ? लहान वयामुळे काहीच समजत नव्हते. त्याच दरम्यान पंढरपूरची श्री विठ्ठलाची मूर्ती स्वप्नात दिसली. याआधी तीही पाहिलेली नव्हती. ही मूर्ती फक्त लहानशी अंगठ्याएवढ्या आकाराची होती. या अशा दर्शनाने मन कशाच्या तरी शोधात लागले.
त्यानंतर वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी श्री गुरुदेवांना साक्षात्कार झाला. त्याचे वर्णन करताना श्री गुरुदेव सांगतात, ‘वयाच्या सातव्या वर्षी मला जो अनुभव आला तो असा, की मी अंगणात झोपलो होतो आणि आकाशातून एक भव्य मूर्ती, जिचा रंग पिवळसर होता, डोळे भव्य होते आणि एखाद्या झरोक्यातून आपण खाली पाहावं तसं ती मूर्ती माझ्याकडे पाहत होती, मी खालून तिच्याकडे पाहत होतो. आश्चर्य वाटेल तुम्हाला, की वय इतके लहान आणि काही समज नसताना सुद्धा त्या मूर्तीने माझ्याकडे पाहिल्यावर त्या क्षणी मला ज्ञान प्राप्त झालं, त्या क्षणी मला अनुभव आला, त्या क्षणी मला समज आली आणि आपल्या जीवनाचे मुख्य कार्य काय आहे हे माझ्या लक्षात आलं. तेव्हा माझं वय वर्षं फक्त सात होतं. वयाच्या सातव्या वर्षी हा अनुभव आल्यानंतर माझी वृत्ती एकदम वैराग्याकडे वळली.’
मागील अनेक जन्मात तपश्चर्या, ईश्वरसेवा, भक्ती झाल्याशिवाय इतक्या लहान वयात ईश्वरी अनुभूती येणे शक्य नाही. त्यानंतर त्यांच्या गुरूंनी म्हणजे श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामींनी त्यांना गाणगापूरला बोलावून घेतले. तिथे संगमावर श्री गुरुदेवांची त्यांच्या गुरूंबरोबर भेट झाली आणि ‘इथून पुढे तुला तपश्चर्या करायची आहे’, असे त्यांनी श्री गुरुदेवांना सांगितले. तपश्चर्या म्हणजे जे श्री गुरुदेवांना प्राप्त झाले त्याबद्दल मौन बाळगणे ! अशारीतीने साडेपाचशे वर्षांपूर्वी कर्दळीवनात गुप्त झालेल्या आणि दत्तात्रेयांचा दुसरा अवतार असलेल्या प. पू. श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामींनी शिव स्वरूपात प्रकट होऊन श्री गुरुदेवांना अनुगृहीत केले. या अनुग्रहानंतर गुरुदेवांच्या मनाची अस्वस्थता एकदम कमी झाली.