सत्संग मंडळाचा एक कार्यक्रम असावा आणि तो कार्यक्रम परमार्थापासून ते सामाजिक कार्य करण्यापर्यंत असावा, फक्त जप, ध्यान, पूजा-आरती एवढेच असू नये. देवधर्माचे कार्य म्हणजे तुम्ही ध्यान करता, चिंतन करता, मनन करता हे अतिशय उत्तम आहे; पण त्याबरोबरच सत्संगातर्फे वेदवाणीचे कार्यक्रम करावेत, भजनाचे कार्यक्रम करावेत, सामाजिक कार्याला मदत करावी.
सत्संगातील वातावरण अतिशय पवित्र व गंभीर असावे. येथे जातीभेद नसावा. सत्संगामध्ये आपल्याला सामील कसे होता येईल ते पाहावे. सत्संग मंडळाची कोणतीच बैठक चुकवू नये. मी जरी बैठकीला प्रत्यक्ष हजर नसलो तरी माझे अस्तित्व तेथे आहे हे गृहीत धरा व प्रत्येक बैठकीला अवश्य हजर राहा. नमस्कार केलात तर मी कोठेही असलो तरी आशीर्वाद नक्की देईन. काही काही वेळा सत्संगाची बैठक चालू असताना अचानक सुंदर, अलौकिक सुगंध आपोआप येऊ लागतो. हा सुगंध अत्तर, उदबत्ती किंवा फुलांचा नसतो; परंतु याहीपेक्षा श्रेष्ठ व सुंदर असतो. हा सुगंध आमचे अस्तित्व दर्शवतो. याचा अनुभव कित्येक भक्तांना आलेला आहे आणि अशावेळी त्यांना विशेष आनंद वाटतो.
दर सत्संगाच्या बैठकीला येताना आपल्या अंत:करणात कशा प्रकारचा भाव आहे हे आपण स्वतः जाणून घ्यावे. सत्संगात तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत म्हणजे आपण सद्गुरूंच्या संगतीत केव्हा आलो, या संगतीत आल्यापासून आपली ऊर्ध्व अवस्था आहे का अधोगती होत आहे, आपण काय शिकलो, आपल्या मनाला त्यापासून किती आनंद मिळाला, आपल्यावर आलेली संकटे गुरुकृपेने किती प्रमाणात दूर झाली असे सर्व अनुभव तुम्ही एकमेकांना सांगितले पाहिजेत. तुमचा भाव किती आणि कोणत्या प्रतीचा आहे हे कळायला बोलण्यावाचून दुसरे काहीही साधन नाही. केवळ साष्टांग नमस्कार घालून, हात जोडून बसले की भावना व्यक्त झाली असे नाही तर आपल्या वागण्याने, बोलण्याने, आपल्या अनुभवांनी भावना व्यक्त करण्याची आवश्यकता आहे.
या सत्संगामध्ये आणि ‘श्री दत्त देवस्थान’, ‘वेदांतनगर’ येथील कार्यात प्रत्येक भक्ताने सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या श्रद्धेचा एक भाग म्हणून प्रत्येक साधकाने सत्संग मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणे हे त्याचे कर्तव्य आहे. सत्संगाच्या कार्यात काही उणीवा असल्यास आपण त्या सर्वांसमोर मांडल्या पाहिजेत तसेच त्या भरून काढल्या पाहिजेत. सत्संगाच्या बैठकीत, देवस्थानाच्या कार्यात प्रत्येकाला सक्रियपणे सहभागी कसं होता येईल याचा विचार व्हावा. या सहभागाला श्रद्धा आणि विश्वासाची जोड असावी म्हणजे उत्तम आचार, विचार आणि संस्कार यांचा प्रसार सफलतेने होईल.