Loading..

श्री गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन

श्री गुरुदेव यांनी

सत्संग मंडळांसाठी केलेले मार्गदर्शन

सत्संग म्हणजे सुसंगती, सत्प्रवृत्ती असलेल्यांचा सहवास ! सत्प्रवृत्ती असणाऱ्यांमध्येही जे वरदपिंड घेऊन म्हणजे ईश्वरी इच्छेने जन्माला आलेले असतात ते श्रेष्ठ समजले जातात. अशांमध्येसुद्धा ज्यांना वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत ईश्वरदर्शन झाले आहे आणि ज्यांना श्री शंकरापासून सुरू झालेल्या गुरुपरंपरेतील गुरूंचा अनुग्रह लाभलेला आहे असे गुरू आणखी श्रेष्ठ असतात. अशा गुरूंचा सहवास मिळणं दुर्लभ असतं. अशा सत्संगाने देह आणि मन शुद्ध होऊन मनुष्य पावित्र्याची आणि मांगल्याची उंची गाठू शकतो.
सत्संगाचा लाभ अनेक प्रकारे घडतो. कीर्तन, प्रवचन, कथा, भजन हे सत्संगच आहेत. तसेच भगवंतावर तयार केलेले अभंग, श्लोक, स्तोत्रे हेसुद्धा तेच कार्य करत असतात; पण याहीपेक्षा उत्तम सत्संग कोणता असेल तर आपल्या गुरूंचे वाक्य ऐकणं आणि त्याप्रमाणे आचरण करणे. सत्संग हा गुरु-शिष्यांचा संवाद आहे. सद्गुरूंच्या आज्ञांचे पालन करणे, त्यांची सेवा करणे, त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे चित्तशुद्धी होणे, चित्तात परमेश्वराविषयी प्रेमाची भावना निर्माण होऊन त्यानुसार प्रत्यक्ष आचरण करणे हाही सत्संगच होय.
सत्संग हे एक व्रत आहे. व्रतसिद्धीसाठी अखंडत्व, दृढ श्रद्धा व निस्सिम भक्तीची आवश्यकता असते. हे व्रत अंगिकारणारा साधक आपल्या गुरूंची सेवा करत गुरुचरणी आपल्या आयुष्याचे निर्माल्य व्हावे ही इच्छा मनी बाळगून जीवन जगतो.
आपण जे वेदकार्य करतो ते धर्माचे कार्य आहे. या कार्यात सर्वसामान्य माणसांचाही सहभाग असावा ज्यायोगे त्यांचा उद्धार व्हावा म्हणून मी गावोगावी सत्संग मंडळांची स्थापना करून घेतली आहे. हा सत्संग स्वतंत्र नसून गुरुस्थानाचा सत्संग आहे हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. सत्संग म्हणजे सर्वांनी एक विचाराने एका ठिकाणी जमायचं आहे, सर्वांनी एक विचार करायचा आणि तो म्हणजे फक्त सत्संगाचा विचार करायचा. आपण या सत्संगात कशासाठी जमतो तर आपल्या सर्वांमध्ये परमेश्वराविषयीच्या विशेष प्रकारच्या भावना आहेत. त्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि इतरांनी व्यक्त केलेल्या भावना जाणून घेण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमत असतो. सत्संगाचा लाभ सामान्य माणसांपर्यंत सर्वांना मिळावा, गुरूंचे शब्द प्रत्येकाला ऐकायला मिळावेत, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असावेत तसेच त्यांच्या काय काय आज्ञा आहेत त्या समजावून घेण्यासाठी सत्संग मंडळांची योजना आहे.
सत्संग मंडळाचे उद्दिष्ट हे त्या त्या गावातील साधक वर्गाला एकत्र आणणे, भक्तांमध्ये एकोपा निर्माण करणे, धर्म म्हणजे काय हे समजून घेणे, संघटित होऊन धर्माबद्दल अभिमान बाळगणे, धर्मप्रसार करणे, गुरुसेवा करून गुरुकृपा संपादन करून घेणे हे आहे. जनमानसात आपल्या देवस्थानाच्या कार्याविषयी जागृती निर्माण करणे आणि उत्तम आचार, विचार, संस्कार यांचा प्रसार करणे हे उद्दिष्ट आहे. गुरुपरंपरेने जे शिकवलेले आहे, सांगितलेले आहे ते आचरणात कसे आणता येईल याचा विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपल्या मनावर उत्तम प्रकारचे संस्कार व्हावेत, चांगल्या प्रकारचे विचार आपल्याला ऐकायला मिळावेत व सर्व गुरुभक्तांना अधिक प्रमाणात गुरुसेवा करता यावी यासाठी सत्संग मंडळांची आवश्यकता आहे.
ही उद्दिष्टे साध्य करताना प्रत्येकाची सद्गुरूंच्या ठायी असीम श्रद्धा तसेच विश्वास असायला हवा, सगळ्यांच्या अंतःकरणात ईश्वराविषयी प्रेमभावना निर्माण व्हायला हवी आणि ईश्वरसेवा अधिकाधिक व्हायला हवी. यासाठी प्रत्येकाने अधिक कर्तव्यदक्ष असायला हवे.
दरमासी सत्संग घेण्याचे कारण असे, की जे गुरुभक्त आहेत, देवभक्त आहेत ते त्यांच्या परीने भक्ती करीतच असतात; पण ती भक्ती अधिक दृढ व्हावी, भक्तीमध्ये तळमळ निर्माण व्हावी, भक्तीचे फळही आपल्याला मिळावे यासाठी कोणाच्यातरी संगतीची गरज आहे, मार्गदर्शनाची गरज आहे. दरमासी होणाऱ्या बैठकीने आपल्या मनावर एक चांगला परिणाम होतो. आपल्यावर चांगले संस्कार व्हावेत, मन अतिशय उल्हसित व्हावे, निर्मल व्हावे, आपल्या मनाला एक प्रकारचे चैतन्य मिळावे यासाठी आपण हा सत्संग घेतो.
सत्संगाच्या बैठकीचे मुख्य ध्येय म्हणजे गुरुभक्ती करणे, गुरुवाक्य प्रमाण मानणे, गुरुवाक्याचे आचरण करणे हे असावे. गुरुवाक्य आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवायचे ठरवले तरी त्याला सफलता येण्यासाठी सुद्धा गुरुकृपेचीच आवश्यकता आहे. त्यासाठी सत्संग मंडळात अधिक प्रमाणात ईश्वराचे चिंतन, स्मरण करून गुरूंच्या आज्ञा पाळाव्यात. त्यांनी दिलेला मार्ग, त्यांनी केलेले मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये तंतोतंत कसे आचरणात आणता येईल याचा विचार करावा.
सत्संग मंडळाची बैठक घेण्यामागे असाही हेतू आहे, की आपल्यात जे दोष आहे ते पूर्णपणे निघून जावेत. हे साध्य होण्यासाठी सत्संग हा भक्तीने ओथंबलेला आणि कणाकणाने ज्ञान देणारा असावा. हे दोष दूर होण्यासाठी मानवी मन आणि शरीर हळूहळू शिकवून तयार करावे लागते. एकदम शिकवलेले पचनी पडत नाही म्हणून सत्संगाच्या प्रत्येक बैठकीमध्ये थोडे ज्ञान दिले जाते.
सत्संगाच्या बैठकीला ईश्वराचे अधिष्ठान असल्यामुळे दर सत्संगामध्ये तुमच्यात आनंद निर्माण होण्याची शक्यता आहे. हा आनंद किती प्रमाणात होईल हे तुमच्या मानसिकतेवर, श्रद्धेवर अवलंबून आहे. या सत्संगाने आपला ओढा परमार्थाकडे लागण्याची आवश्यकता आहे कारण प्रपंच हा प्रारब्धाने होतो तर परमार्थ हा कृतीने करावा लागतो.
मासिक बैठकीच्या सुरुवातीला गुरुध्यान करावे. त्याचबरोबर आपल्या प्रधान देवतेचे म्हणजे भगवान श्री दत्तात्रेयांचे स्मरण करावे, गुरुस्तुतीपर स्तोत्रे म्हणावीत. मागील महिन्यात सत्संग मंडळांनी काही योजना आखलेली असल्यास ती पूर्ण झाली का नाही ते पाहावे. त्यानंतर पुढील महिन्यात काय करायचे तेही ठरवून घ्यावे. बैठकीत काय ठरले हे नुसते ऐकण्यापेक्षा कर्तव्यबुद्धी जागरूक ठेवावी. सत्संगाला येणाऱ्या कोणालाही चांगले विचार मांडण्यास परवानगी द्यावी. नंतर आरती करावी, प्रार्थना म्हणावी आणि सर्व झाल्यानंतर ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हणून बैठक समाप्त करावी.
Size 12 X 18 inc
सत्संग मंडळाचा एक कार्यक्रम असावा आणि तो कार्यक्रम परमार्थापासून ते सामाजिक कार्य करण्यापर्यंत असावा, फक्त जप, ध्यान, पूजा-आरती एवढेच असू नये. देवधर्माचे कार्य म्हणजे तुम्ही ध्यान करता, चिंतन करता, मनन करता हे अतिशय उत्तम आहे; पण त्याबरोबरच सत्संगातर्फे वेदवाणीचे कार्यक्रम करावेत, भजनाचे कार्यक्रम करावेत, सामाजिक कार्याला मदत करावी. सत्संगातील वातावरण अतिशय पवित्र व गंभीर असावे. येथे जातीभेद नसावा. सत्संगामध्ये आपल्याला सामील कसे होता येईल ते पाहावे. सत्संग मंडळाची कोणतीच बैठक चुकवू नये. मी जरी बैठकीला प्रत्यक्ष हजर नसलो तरी माझे अस्तित्व तेथे आहे हे गृहीत धरा व प्रत्येक बैठकीला अवश्य हजर राहा. नमस्कार केलात तर मी कोठेही असलो तरी आशीर्वाद नक्की देईन. काही काही वेळा सत्संगाची बैठक चालू असताना अचानक सुंदर, अलौकिक सुगंध आपोआप येऊ लागतो. हा सुगंध अत्तर, उदबत्ती किंवा फुलांचा नसतो; परंतु याहीपेक्षा श्रेष्ठ व सुंदर असतो. हा सुगंध आमचे अस्तित्व दर्शवतो. याचा अनुभव कित्येक भक्तांना आलेला आहे आणि अशावेळी त्यांना विशेष आनंद वाटतो. दर सत्संगाच्या बैठकीला येताना आपल्या अंत:करणात कशा प्रकारचा भाव आहे हे आपण स्वतः जाणून घ्यावे. सत्संगात तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत म्हणजे आपण सद्गुरूंच्या संगतीत केव्हा आलो, या संगतीत आल्यापासून आपली ऊर्ध्व अवस्था आहे का अधोगती होत आहे, आपण काय शिकलो, आपल्या मनाला त्यापासून किती आनंद मिळाला, आपल्यावर आलेली संकटे गुरुकृपेने किती प्रमाणात दूर झाली असे सर्व अनुभव तुम्ही एकमेकांना सांगितले पाहिजेत. तुमचा भाव किती आणि कोणत्या प्रतीचा आहे हे कळायला बोलण्यावाचून दुसरे काहीही साधन नाही. केवळ साष्टांग नमस्कार घालून, हात जोडून बसले की भावना व्यक्त झाली असे नाही तर आपल्या वागण्याने, बोलण्याने, आपल्या अनुभवांनी भावना व्यक्त करण्याची आवश्यकता आहे.
या सत्संगामध्ये आणि ‘श्री दत्त देवस्थान’, ‘वेदांतनगर’ येथील कार्यात प्रत्येक भक्ताने सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या श्रद्धेचा एक भाग म्हणून प्रत्येक साधकाने सत्संग मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणे हे त्याचे कर्तव्य आहे. सत्संगाच्या कार्यात काही उणीवा असल्यास आपण त्या सर्वांसमोर मांडल्या पाहिजेत तसेच त्या भरून काढल्या पाहिजेत. सत्संगाच्या बैठकीत, देवस्थानाच्या कार्यात प्रत्येकाला सक्रियपणे सहभागी कसं होता येईल याचा विचार व्हावा. या सहभागाला श्रद्धा आणि विश्वासाची जोड असावी म्हणजे उत्तम आचार, विचार आणि संस्कार यांचा प्रसार सफलतेने होईल.
तुम्हाला सत्संग हा अधिष्ठान म्हणून दिला आहे, तो चालवण्याकरता तेवढी शक्ती दिली आहे आणि हे अधिष्ठान चालवण्याची जबाबदारी तुमची आहे. सत्संगाची बैठक ही अध्यात्माची बैठक असून या आध्यात्मिक बैठकीला आपले गुरू प्रत्यक्ष हजर आहेत असा विशिष्ट भाव तुम्हा लोकांमध्ये असण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या उपस्थितीतच आम्ही सत्संग साजरा करतो असा तुमचा मूळ विचार असायला पाहिजे. सत्संगाला येण्यात औपचारिक भाग किती व कर्तव्याचा भाग किती हे तुम्ही लोकांनीच ठरवायचे आहे. औपचारिक भाग म्हणून तुम्ही सत्संगाला येत असाल तर ती तुमच्या हातून होणारी फार मोठी चूक आहे. कर्तव्य भावनेतून सत्संगाला उपस्थित राहा. तुम्ही सर्व भक्तांनी मनामध्ये कोणताही संशय न ठेवता कर्तव्यबुद्धीने उपासना केली, कर्तव्यबुद्धीने कार्य करायचं ठरवलंत तर ही शक्ती तुमच्या पाठीमागे उभी राहील यात शंका नाही. या सत्संगाला ईश्वरी अधिष्ठान असल्यामुळे तुम्हाला कार्य करणे सोपे आहे कारण
‘सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।।’
सत्संगाची बैठक महिन्यातून एकदाच होत असली तरी आपण त्याचे अनुसंधान सतत ठेवावे म्हणजे बैठकीत काहीतरी बोलण्याची स्फूर्ती येईल. जेवढा आपला आचार चांगला तेवढे आपले विचार प्रभावी असू शकतात. थोड्याशा अभ्यासानेही चांगले विचार मांडता येतात. या सत्संगात तुम्ही सर्व साधकांनी परमेश्वराचे ध्यान करावे. असे ध्यान हे फक्त सत्संगाच्या बैठकीतच करावे असे नसून सत्संग हा मनाशी कायम ठेवावा. असे केल्याने जेव्हा आपण सत्संगाच्या बैठकीसाठी जाऊ तेव्हा आपल्या मनाची स्थिती श्रेष्ठ राहील.
ज्या ज्या गावी सत्संग मंडळे स्थापन झाली आहेत त्या प्रत्येकाला माझे सांगणे आहे, की आपण धर्म आचरा. धर्म प्रत्यक्ष आचरल्याशिवाय माणसाच्या जीवनाचे सार्थक होत नाही. तुम्ही धर्म आचरत राहिलात म्हणजे आपोआप तुम्ही श्रेष्ठ अवस्थेला जाल, मनाला शांती लाभेल. धर्म आचरायचा असेल तर गुरूंच्या सहवासाशिवाय, त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय ते अगदी अशक्य आहे. ज्यांच्यापासून आपण जे शिकायला पाहिजे ते शिकलं तरच अनुभव येईल नाहीतर येणार नाही. तेव्हा ही परंपरा सोडून शक्यतो दुसऱ्या परंपरेला जवळ करू नका. आपल्या गुरूंनी दिलेला शब्द हाच सत्य आहे हे अनुभवाला येईल आणि हेच सत्य आचरावे अशी तुमची कल्पना होईल. त्याप्रमाणे मी मार्ग दाखविलेला आहे.
सत्संगाचे ऑगस्ट २०२४ मधील विविध कार्यक्रम

कार्यक्रम

सत्संग मंडळाचा कार्यक्रम हा परमार्थापासून ते सामाजिक कार्य करण्यापर्यंत असावा, फक्त जप, ध्यान, पूजा-आरती एवढेच असू नये. देवधर्माचे कार्य म्हणजे तुम्ही ध्यान करता, चिंतन करता, मनन करता हे अतिशय उत्तम आहे; पण त्याबरोबरच सत्संगातर्फे वेदवाणीचे कार्यक्रम करावेत, भजनाचे कार्यक्रम करावेत, सामाजिक कार्याला मदत करावी.

सत्संग

‘।। निर्माल्याची ही अपेक्षा न ठेवता सर्व भक्तांनी व कार्यकर्त्यांनी गुरु चरणांची सेवा करावी ही श्री सद्गुरूंची मुख्य शिकवण आहे ।।’

प्रसार सेवा
अधिक माहिती साठी